सांगली: कडेगावात काँग्रेसचा भाजप-राष्ट्रवादीला धक्का, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे इनकमिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:32 PM2022-11-05T14:32:08+5:302022-11-05T14:32:40+5:30
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा कार्यक्रम सुरु झाला आहे.
कडेगाव: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सत्ता नसतानाही कडेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये आता इनकमिंग होत आहे. आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यावर विश्वास ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत कडेगाव तालुक्यातील अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद, वडिये रायबाग, नेवरी, शिवाजीनगर, आंबेगाव, मोहित्यांचे वडगाव या नऊ गावातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर, आंबेगाव, वडियेरायबाग, नेवरी येथील कार्यकर्त्यांनी कडेगाव येथे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद येथील कार्यकर्त्यांनी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. यावेळी पुष्पहार घालून या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांपासून कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाजातील विविध घटकांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ गावांमधील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यातील काही कार्यकर्ते भाजप मधून तर काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत.
यावेळी विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील पददलितांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहिला आहे. पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकांची पार्श्वभूमी
आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या संस्थात्मक शक्तीचा प्रभाव आणि संघटन कौशल्य यामुळे कडेगाव तालुक्यातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचा कार्यक्रम सुरु झाला आहे.