सांगली : जिल्हा परिषदेकडून सप्टेंबर २०२२ मध्ये घेतलेल्या पाणी नमुन्यांमध्ये जिल्ह्यातील ६९९ गावापैकी ८२ गावांमधील १०२ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेन ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच काही गावांमधील पाण्याचे नमुने वारंवार दूषित येत असल्यामुळे त्यांना दूषित पाण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील एक हजार १८४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये वाळवा तालुक्यातील २०६ ठिकाणीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, २३ गावांतील २७ पाणी नमुने दूषित आले आहेत. यामध्ये साखराळे, गौडवाडी, बागणी, भडकंबे, रोझावाडी, शिगाव, पडवळवाडी, इटकरे, कुंडलवाडी, बहादूरवाडी, पोखर्णी, कारंदवाडी, डोंगरवाडी, करंजवडे, शेखरवाडी, केदारवाडी, खरातवाडी, विठ्ठलवाडी, बेरडमाची, किल्ले मच्छिंद्रगड, नरसिंगपूर, रेठरेहरणाक्ष, शिरटे या गावातील दूषित पाण्याचे प्रमाण १३.१ टक्के आहे.शिराळा तालुक्यातील धसवाडी, फुपेरे, अस्वलेवाडी, कोकरूड, मालेवाडी, बेलेवाडी, खिरवडे, मोरेवाडी, औढी, तडवळे, बिऊर, खेड, करमाळे, भटवाडी, इंगरूळ, भागाईवाडी, आदी २४ गावांमध्येही १३ टक्के दूषित पाण्याचे प्रमाण आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची, आवळाई, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, पारेकरवाडी, करुंदवाडी, झरे, विभूतवाडी आणि जत तालुक्यातील मेंढेगिरी, कुडणूर बागेवाडी, येळवी आणि गुळवंची या गावामध्येही दूषित पाणी आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील १७, तासगाव ४, खानापूर ४ आणि कडेगाव तालुक्यांत पाच गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले असून, तेथील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दूषित गावांची तालुकानिहाय संख्यातालुका - गावे - दूषित नमुने संख्याआटपाडी - ८ - १२जत - ५ - ५मिरज - १७ - २०तासगाव - ४ - ४वाळवा - २३ - २७शिराळा - १६ - २४खानापूर - ४ - ५कडेगाव - ५ - ५एकूण - ८२ - १०२
ग्रामपंचायतींनी जनतेला शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे. पाणी शुद्धिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या त्रुटीही दर्जेदार वापरण्याची गरज आहे. वारंवार दूषित पाण्याचे नमुने आलेल्या ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. - विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.