सांगली : जिल्ह्यात विविध प्रकाराचे उद्योग उभारणीसाठी ६० उद्योजकांनी एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योगांमुळे जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. यासंबंधी ६० उद्योजकांशी शासनाने सोमवारी सामंजस्य करारही झाला आहे. वर्षभरात उद्योगाची उभारणी होणार असून शासनाकडून मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा सिंचन योजनांमुळे ओलिताखालील क्षेत्र वाढले आहे. ऊस, द्राक्ष, हळ, मक्याचे क्षेत्र वाढले असून उद्योगासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यातून नागपूर ते रत्नागिरी, गुहागर ते विजापूर असे महत्त्वाचे महामार्ग गेले आहेत. रेल्वेमार्गही गतिमान झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येऊ लागले आहेत हे जमेची बाजू आहे.झिरान इंडिया, हिंदुस्थान नॉयलॉन, गोदावरी उद्योग, सुदर्शन ॲलिम्युनिअम, द बेस्ट इंडिया, उमेद ग्रुप, भरणी धरण पांडीया, इंडियन ह्यूम पाइप, दांडेकर ग्रुप आदींसह ६० उद्योजकांनी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी एक हजार २५ कोटी रुपयांची जिल्ह्यात गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योजकांनी तसा सामंजस्य करार जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शासनाशी केला आहे. या उद्योगांचा विस्तार वाढल्यानंतर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.
शासनाकडून जागा, रस्ते, पाणी सुविधा देणार : विद्या कुलकर्णीउद्योजकांनी जिल्ह्यात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे आमचे उद्दिष्ट होते. पण, उद्योजकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी ठेवली आहे. या उद्योजकांना लागणारी जागा, रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह अन्य मूलभूत सुविधा मिरज, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.