सांगली : सहकार विभागाच्या मोहिमेत जिल्ह्यात एकूण ९४२ सहकारी संस्था बिनकामी निघाल्या आहेत. यातील एकूण ५४३ संस्था अवसायनात काढताना ४२६ संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. तालुकानिहाय आकडेवारीही आता संकलित झाली असून अवसायनात निघालेल्या आणि नोंदणी रद्द झालेल्या सर्वाधिक संस्था मिरज तालुक्यातील असून, वाळवा तालुका याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहकार विभागाच्या सर्वेक्षण मोहिमेत पहिल्या टप्प्यात ३३४ संस्था बंद अवस्थेत, ३०४ संस्था कार्यस्थगित असलेल्या, तर १२१ संस्था जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील या संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी ३९९ संस्था अवसायनात निघाल्या होत्या. त्यामध्ये आणखी ५४३ संस्थांची भर पडल्याने, ही संख्या ९४२ वर गेली. अवसायनात गेलेल्या ज्या संस्थांच्या चालकांनी सहकार विभागाशी कोणताही संपर्क केला नाही, याशिवाय त्यांचा शेवटपर्यंत शोध लागला नाही, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. जिल्ह्यातील अशा ४२६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. उर्वरित ५४३ संस्था अवसायनात असून त्यातील आणखी काही संस्थांची नोंदणीही रद्द होऊ शकते. या मोहिमेअंतर्गत प्रशासनातील आणि लेखापरीक्षण विभागातील ५४ जणांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने ३० सप्टेंबर २०१५ ला सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्याचा एकत्रित अहवाल आता तयार करण्यात आला होता. यामध्ये ४०८९ पैकी केवळ ३ हजार ३३० संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यात १0८ संस्थांची नोंदणी रद्द
By admin | Published: April 17, 2016 10:54 PM