इस्लामपूर: खासगी ट्रॅव्हल्स बसमधून मुंबईहून बेंगलोरकडे निघालेल्या नायजेरीयन तरुणाला जेरबंद करत पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेनसदृश अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केला. ही कारवाई मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा येथे झाली. यातील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोनेटो जॉन झाकिया (२५,जमोरिया मांगाणो,टांझानिया) असे अटकेत असणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
झाकिया हा आपल्या ताब्यात कोकेन सदृश्य अंमली पदार्थ बाळगून खासगी ट्रॅव्हल्स बसने (केए-५१-एएफ-६२९१)मुंबईतून बेंगलोरकडे निघाल्याची टीप मिळाल्यावर येथील पोलिसांनी वाघवाडी फाट्यावर सापळा लावला. रात्री दोनच्या सुमारास ही बस वाघवाडी फाट्यावर आली असता पोलिसांनी बस थांबवून संशयित झाकिया याची झडती घेतली. यावेळी त्याच्या बॅगेत ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम अंमली पदार्थांचा साठा पोलिसांना मिळाला. त्यांनतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
हवालदार दीपक ठोंबरे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हे कोकेनच आहे का?वाघवाडी फाट्यावर जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचा साठा हा कोकेनचा आहे का? याची तपासणी करण्यासाठी तो पुणे येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.