सांगली : विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथील हाॅटेल आर्यामध्ये गुरुवारी टोळक्याने धिंगाणा घालत तोडफोड केली होती. हल्लेखोरांनी हाॅटेलचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान केले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ११ जणांना अटक केली. संशयितांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गणेश श्रीमंत पाटील (३४, रा. वान्लेसवाडी), बाबासाहेब उर्फ बापशा वसंत चव्हाण (३४, रा. वान्लेसवाडी), विनायक बापु दुधाळ (३४, रा. स्वामी समर्थ कॉलनी), जयकिसन उर्फ बबलु ज्ञानु माने (३१, रा. वान्लेसवाडी), मल्लाय्या येरतय्या मठपती (२९, रा. बेथेलियम नगर, मिरज), बिरू दिगंबर गडदे (२८, रा. जत, सद्या चाणक्य चौक), राहुल मनोहर रूपनर-दुधाळ (२२, वान्लेसवाडी), नदीम बादशाहा शेख (३५, रा. गजराज कॉलनी), राजकुमार परशुराम पुजारी (३२, रा. वान्लेसवाडी), अवधुत रंगराव दुधाळ (२१, वान्लेसवाडी), नितीन लक्ष्मण शिंदे (३०, रा. सांगलीवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. यापूर्वी सोहेल शेख, अजित अलगुरे, राकेश वाठार यांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हसनी आश्रम येथे महेश कर्णी यांचे हॉटेल आर्या फिर्यादी आकाश शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी चालवण्यासाठी घेतले आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास संशयित गणेश पाटील, नदीम शेख व त्यांच्यासोबत पाच जण हॉटेलमध्ये आले. त्यावेळी संशयितांनी जेवणाची मागणी केली. हॉटेल चालकाने नकार दिल्यानंतर पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये काही जणांनी लोखंडी गज घेऊन तोडफोड केली. हॉटेलचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच गल्ल्यातील २२ हजारांची रक्कमही चोरी केली. घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली. त्यानंतर आता पुन्हा अकरा जणांना अटक केली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, दरिबा बंडगर, सुनील पाटील, महमंद मुलाणी, संदीप घस्ते, भावना यादव यांचा कारवाईत सहभाग होता.