सांगली : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून चोरट्यांनी लंपास केलेले तब्बल १५ लाख रुपये किमतीचे ११० मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले. सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी याचा शोध लावत, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते मूळ मालकांना हे मोबाइल परत देण्यात आले. मोबाइल चोरीस गेल्यानंतर तो परत मिळेल, ही आशाच सोडून दिलेल्या ग्राहकांना मोबाइल परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.शहरासह अनेक भागांत मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. दरवाजा उघड्या असलेल्या घरात प्रवेश करून आतील मोबाइल लांबविण्याचेही प्रकार होत आहेत. मोबाइल चोरीच्या घटनेतील वाढ लक्षात घेऊन याचा तपास करण्याच्या सूचना अधीक्षक डॉ. तेली, अपर अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले होते.
त्यानुसार सायबर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास करून तब्बल १५ लाख रुपये किमतीच्या मोबाइलचा शोध लावला. कर्नाटकसह राज्यातील विविध भागांतून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाइल फोनचे बिल अथवा त्याची ओळख पटवून मूळ मालकांना ते परत देण्यात आले. यात चोरी केलेले व गहाळ झालेल्या माेबाइलचा समावेश होता.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सायबरचे उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, महादेव घेरडे, अमिन सय्यद, संदीप पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांना अनपेक्षित धक्काचोरीस गेलेला अथवा गहाळ झालेला मोबाइल परत मिळणार नाहीच या शक्यतेवर असलेल्या नागरिकांना मोबाइल परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. पोलिस दलाच्या उपक्रमाची प्रशंसा करत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मोहीम सुरूच राहणारपोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी यापुढेही सायबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही मोहीम सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नियमित तपास सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.