सांगली : महापालिकेच्यावतीने पुस्तक बँक सुरू करण्यात आली असून या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ११०० पुस्तके जमा करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयात पुस्तक बँक सुरू करण्यात आली आहे. शहरात वाचन चळवळ वाढावी, घरातील जुनी पुस्तके रद्दीत न जाता त्यांचा पुनर्वापर व्हावा, या उद्देशाने आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुस्तक बँकेची संकल्पना मांडली. जुनी पुस्तके महापालिकेकडे दान द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. गेल्या दहा दिवसात वाचनालयाकडे ११०० पुस्तके जमा झाली आहेत. अजूनही नागरिक पुस्तक दानासाठी पुढे येत असून नागरिकांनी जास्तीत जास्त पुस्तके दान करावीत, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.