सांगली : जिल्हा नियोजन समिती आणि स्वीय निधीतून जिल्ह्यातील चार नवे आणि ८३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतील कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात दिली आहे. ही कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी बुधवारी दिली.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि पाझर तलाव आहेत. गेल्या काही वर्षांपासून बंधारे दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. बंधारे दुरुस्तीअभावी पावसाचे पाणी अडवता येत नव्हते. तलावांच्या गळतीमुळे पाणी साठून राहत नसल्याचे स्पष्ट झाले होते. बंधारे दुरुस्तीबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे निधीची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे बंधारे दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळला होता. बंधारे दुरुस्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ११ कोटी रुपयांचा निधी दिला होता. याशिवाय जिल्हा परिषदेच्या निधीतून २९ लाख रुपये दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहेत.
लघु आणि छोटे पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ८३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. त्यामध्ये खटाव, बोलवाड, मोराळे, पेड, गुळवंची, देशमुखवाडी, भाळवणी क्रमांक तीन, चिंचणी (खानापूर), शिरगाव क्रमांक १, कुंडल, पलूस, कुरळप क्रमांक ३, ऐतवडे, कापूस खेड, नाटोली, अंत्री बुद्रुक, बांबवडे, ढगेवाडी, काराजगी, कोसारी क्रमांक चार, कुंभारी, करजगी, बालगाव, कोणतें बोबलाद, कामेरी, शेणे, माडगुळे, पळसखेल क्रमांक १, शाळगाव, सोनसळ क्रमांक १, इंगरुळ, भाटशिरगाव, अलकुड एस, जायगव्हाण, सिद्धेवाडी, दहिवडी, सुलतानगादे, नागेवाडी, बामणी, भाग्यनगर, करंजे, खंबाळे, कळंबी, हिंगणगाव, टाकवे, बिऊर, शेडगेवाडी, रेटरे धरण, करंजवडे, पेठ, ओझर्डे, आटपाडी तालुक्यातील आटपाडी, हिवतड क्रमांक ५, बाळेवाडी, गोमेवाडी, वाघोली, सावळज आणि वड्डी बंधाऱ्याचा समावेश आहे. या प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे.