संतोष भिसेसांगली : पुणे - मिरज लोहमार्गावरील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या नीरा ते लोणंद या ७. ६४ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रविवारी पाहणी अंती हिरवा कंदिल दर्शविला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली. चाचणीसाठी ११७ किलोमीटर प्रतितास या गतीने एक्स्प्रेस गाडी धावली. यानिमित्ताने रेल्वेने दसऱ्यापूर्वीच सीमोल्लंघन केले आहे.पाहणीवेळी बांधकाम विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे ते मिरज या २७९.०५ किलोमीटर लोहमार्गापैकी १७४.६८ किलोमीटर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे ते शिंदवणे, आंबळे ते राजेवाडी, दौंडज ते वाल्हा, शेणोली ते किर्लोस्करवाडी, सातारा ते कोरेगाव, पळशी ते जरंडेश्वर, नांद्रे ते सांगली या मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे.
नीरा ते लोणंद सेक्शनमध्ये विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले की, एप्रिल २०२३ पासून मध्य रेल्वेने १३७.६७ किलोमीटर लांबीचे मल्टीट्रॅकिंग (दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाइन, नवा मार्ग) पूर्ण केले आहे. या मार्गावरील ३२ पैकी २९ स्थानकांच्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. २८० किलोमीटर लोहमार्गापैकी २०० किलोमीटरचे लिंकिंग पूर्ण झाले आहे. १५१ किलोमीटर लांबीचे विद्युतीकरण झाले आहे.
असा आहे दुहेरीकरण प्रकल्प
- एकूण लांबी - २७९.०५ किलोमीटर
- दुहेरीकरण पूर्ण - १७४.८५ किलोमीटर (६२.६५ टक्के)
- प्रकल्पाचा खर्च - ४ हजार ८८२.५३ कोटी रुपये
- आजवर झालेला खर्च - ३ हजार २०० कोटी (६५.५३ टक्के)
- आतापर्यंत काम पूर्ण - ८६ टक्के
- भूसंपादन - ९७.०४ हेक्टर (८४.३८ टक्के)
- पूर्ण झालेले सेक्शन - पुणे-शिंदवणे, आंबले- आदर्की, पळशी-जरंडेश्वर, सातारा-कोरेगाव, सांगली-शेणोली.
- मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य - ७३.७० किलोमीटर पळशी-आदर्की, सातारा-जरंडेश्वर, शेणोली-तारगाव, सांगली-मिरज.
- प्रगती पथावरील कामे - ३०.५० किलोमीटर - आंबले-शिंदवणे, तारगाव-कोरेगाव.
पूर्ण कामे
- मातीकाम : २.८५ कोटी घनमीटर
- मोठे पूल : ७५ पैकी ५७ पूर्ण
- छोटे पूल : ४८४ पैकी ३६५ पूर्ण
- लोहमार्गावरील उड्डाण पूल १० पैकी ७ पूर्ण
बोगद्यांची स्थिती अशी
- एकूण बोगदे : तीनपैकी अडीच पूर्ण
- सफाले आदर्कीदरम्यान २७४ मीटर बोगदा पूर्ण
- आदर्की ते वाठारदरम्यान १६९ मीटर बोगदा पूर्ण
- आंबळे ते शिंदवणेदरम्यान ११० मीटर बोगद्याचे काम सुरू.