सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी आरोग्य विभागातील तीन डॉक्टरांसह १२ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीचे काम दररोज सुरु असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.गेल्या महिन्यात पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. आतापर्यंत सातजणांना अटक केली आहे, तर नऊ संशयित अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धडपडत आहेत. अटकेतील संशयितांकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील तीन डॉक्टरांसह बारा कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी या सर्वांना सोमवारी दुपारी चार वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची लेखी नोटीस जिल्हा परिषदेला पाठविली होती. या नोटीसमध्ये संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नावे व त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार हे सर्वजण चौकशीसाठी हजर झाले होते.प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. डॉक्टरसह कर्मचाऱ्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आतापर्यंत शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. चौकशीतून निष्पन्न होणाऱ्या महितीच्याआधारे तपासाला दिशा दिली जात आहे. बुधवारी काही कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्या आले आहे. (प्रतिनिधी)जामिनावर निर्णयअटकेत असलेल्या शशांक जाधव, सतीश मोरे, अशोक माने व शिवाजी गायकवाड यांच्या पोलीस कोठडीची मंगळवारी मुदत संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अन्य आठजणांनी अटकपूर्व दाखल केलेल्या अर्जावर ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
डॉक्टरांसह १२ जण ताब्यात
By admin | Published: December 29, 2015 11:28 PM