सांगली : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ६७ लाखांहून अधिक अभिलेख आतापर्यंत तपासले आहेत. त्यातून जिल्ह्यात १२ हजार नोंदी सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम राज्यभरात मिशन मोडवर सुरू आहे. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही युद्धस्तरावर तपासणी मोहीम सुरू आहे. बुधवारपर्यंत (दि. १५) ६७ लाख ४६ हजार २७० अभिलेखांतून १२,८०३ नोंदी सापडल्या. या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहत आहेत.
जिल्हा व तालुका स्तरांवरील विशेष कक्षात अभिलेखे तपासण्यात आले. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलिस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमी अभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिकेतील जन्म-मृत्यू रजिस्टर, नगरपालिका, उपवनसंरक्षक कार्यालय, अशा ११ कार्यालयांतील दप्तरांची छाननी करण्यात आली. १९६७ पूर्वीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके, सेवा अभिलेखे तपासले.महसूल विभागांतर्गत १० तहसील कार्यालये व एक अप्पर तहसील कार्यालयात २२ लाख ४३ हजार ९१८ नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये ९ हजार ७३१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. अन्य कार्यालयांतून ४५ लाख २ हजार ३५२ नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये ३ हजार ७२ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
जुन्याच नोंदी महत्त्वाच्यागेल्या २०-२५ वर्षांत काही पालकांनी शाळांमध्ये मुलांची जात कुणबी, अशी नोंदविली आहे; पण १९६७ पूर्वीच्याच नोंदी महत्त्वाच्या असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने केले आहे. सध्या दप्तर तपासणी करतानाही १९६७ पूर्वीचेच अभिलेख तपासले जात आहेत. अलीकडील काळातील कुणबींना प्रमाणपत्रासाठी जुने पुरावे सादर करावे लागतील.शाळेत मुलाची जात कुणबी नोंदविली असली, तरी वंशावळीनुसार ती सिद्ध करावी लागेल. सध्या प्रशासनाने शोधलेल्या कुणबी नोंदी सरकारी पोर्टलवर काही दिवसांनी पाहायला मिळणार आहेत. त्यानुसार आपण मराठा की कुणबी, हे निश्चित करता येणार आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या संपल्याने अभिलेखे तपासणी पुन्हा वेगात सुरू झाली आहे.