सांगली : जिल्ह्यातील ७२०१ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. सध्या आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, जत, तासगाव, मिरज तालुक्यांतून दहा कंटेनरमधून १२० टन द्राक्षांची निर्यात दुबईला झाली आहे. यापैकी उत्तम दर्जाच्या काही द्राक्षांना प्रतिकिलो १२० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातून यावर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ७२०१ शेतकऱ्यांनी ४१८० हेक्टर द्राक्षांची निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कृषी विभागाकडे १६ हजार शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीबद्दल विचारणा केली आहे. पण, त्यांच्याकडून अधिकृत नोंदणी झालेली नाही. युरोपियन युनियन व्यतिरिक्त मलेशिया, सिंगापूर, रशिया व आखाती देशातही द्राक्ष निर्यात सध्या सुरू आहे. थॉमसन सिडलेस, गणेश जातीच्या द्राक्षांची निर्यात सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील तळेवाडी, चिंचाळे, नेलकरंजी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील सावर्डे, मिरज तालुक्यातील सलगरे, जत, सातारा जिल्ह्यातील मायणी येथून दुबईला द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत दहा कंटेनरमधून १२० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यापैकी चांगल्या दर्जाच्या द्राक्षाला प्रतिकिलो १२० रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.चाचणी नसेल तरीही पाठवा दुबईला द्राक्षे
- युरोप राष्ट्रात द्राक्ष निर्यातीसाठी द्राक्षांमध्ये रासायनिक औषधांचे अंश चालत नाही. चाचणी अहवाल असल्याशिवाय युरोप राष्ट्रात द्राक्ष स्वीकारली जात नाहीत.
- याउलट दुबई, सौदी अरेबियात चाचणी अहवालाची गरज नाही. यामुळे या देशांमध्ये सध्या जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरू आहे. युरोपात आणखी दोन महिन्यांनीच निर्यात होईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे