सांगली : जिल्ह्यातील दिव्यांगांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार लसीकरण केंद्रावर येणाऱ्या दिव्यांगांना लस दिली जाणार आहे. सर्व तालुक्यांतील दिव्यांगांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाठविण्यात आली आहे. त्यांना लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करावे अशी सूचनाही डुडी यांनी केली.
दरम्यान, सोमवारी लसीचे १२ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यामुळे उद्या जिल्हाभरातील सर्वच म्हणजे २७६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांनाही लस दिली जात आहे. या वयोगटातील दिव्यांग लाभार्थ्यांना लस घेण्याचे आवाहन डुडी यांनी केले आहे. लसीकरणासाठी थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हाभरात ३ हजार ४६२ जणांना लस देण्यात आली. पहिला डोस २ हजार ९७४ जणांना, तर दुसरा डोस ४८८ लाभार्थ्यांना मिळाला. ३० ते ४४ वर्षे वयोगटात २ हजार ३६२ जणांचे लसीकरण झाले. आजवरचे एकूण लसीकरण ७ लाख ६० हजार ४२० इतके झाले आहे.