शिराळा : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामध्ये २० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान द्वितीय फुलपाखरू सर्वेक्षण पार पडले. सह्याद्री व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठानच्या सह्याद्री वाइल्डलाइफ रिसर्च फॅसिलिटीच्या सिटीझन सायन्स उपक्रमाअंतर्गत राज्यभरातून एकूण ३८ फुलपाखरूप्रेमींनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणमध्ये एकूण १२२ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.या सर्वेक्षणात चार आठवड्यांतील प्रत्येक शनिवार-रविवार व्याघ्रप्रकल्पामधील क्षेत्रीय कर्मचारी व सहभागी फुलपाखरूप्रेमी यांच्या माध्यमातून एकूण ७५ नियतक्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान जंगल, गवताळ भाग, सडे व पाणथळ भाग अशा सर्व अधिवासांमध्ये सकाळी व सायंकाळी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण व स्थानिक फुलपाखरांच्या नोंदी केल्या. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मोरमोन, मलबार ट्री-निम्फ, ब्लू-ओक लीफ, सदर्न ब्लू-बॉटल, क्रिमसन रोज तसेच नवाब, यामफ्लाय, कॉमन मॅप, कॉमन बँडेड पिकॉक अशा अनेक सुंदर फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या. जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या एटलास-माँथ पतंगाचीही नोंद या सर्वेक्षणमध्ये करण्यात आली.पावसाळ्यानंतर जंगलामध्ये फुलणारा रंगीत फुलोरा व परागीभवन करत पराग घेण्यासाठी फुलपाखरांची सुरू होणारी चढाओढ आणि याचदरम्यान विद्यार्थी व नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल प्रेम व निसर्ग संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी देशभरात आयोजित केला जाणारा ‘बिग बटरफ्लाय मंथ’अंतर्गत हे फुलपाखरू सर्वेक्षण आयोजित केले होते.
पुढील काही महिन्यांत पक्षी सर्वेक्षण आयोजित होणार आहे. यामध्ये पक्षिप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल प्रेम व निसर्ग संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी देशभरात हे फुलपाखरू सर्वेक्षण आयोजित केले होते. - नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली