सांगली : ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. १ ते ३० नोव्हेंबर या महिन्याभरात परदेशातून १२५ प्रवासी जिल्ह्यात आल्याचे आरोग्य विभागाला आढळले आहे. यंत्रणा त्यांचा माग काढत आहे.
ओमायक्रॉन विषाणूने बाधित एकही संशयित जिल्ह्यात सध्या नाही; पण परदेशातून आलेल्यांवर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये १२५ जण परदेश प्रवास करून आले आहेत. त्यापैकी ९९ प्रवासी महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. यातील काहीजण पुन्हा परदेशात गेले आहेत, तर काही मुंबई व पुण्याला गेले आहेत. जिल्ह्यात आलेल्या नागरिकांशी आरोग्य विभागाने संपर्क साधला असून, त्यांना घरगुती विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. मिरज कोविड रुग्णालयातील प्रयोगशाळेत त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. त्याचा अहवाल शनिवारी (दि. ४) सकाळपर्यंत मिळेल. हे सर्वजण विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली आहे; पण आरोग्य विभाग पुन्हा खबरदारी घेत आहे. यातील अनेकजण जिल्ह्यात येऊन पंधरवडा लोटला असल्याने पुन्हा नव्याने चाचणी केली जात आहे.
परदेशातून आलेल्या ११ जणांचे स्वॅब घेतले
ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरात महापालिका क्षेत्रात ९९ जण विविध देशांतून आले होते. त्यापैकी ५१ जणांचा शोध घेण्यात आला, तर परदेशातून आलेल्या ११ व त्यांच्या संपर्कातील पाचजणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
आफ्रिकेतून कोणी परतले नाही
अमेरिका, युरोप, बहरीन, दुबई, कतार, जपान या देशांतून बहुतांश लोक शहरात आले आहेत. त्यात पर्यटक अधिक आहेत. काहीजण नोकरीच्या निमित्ताने त्या देशात गेले होते. दक्षिण आफ्रिका खंडातून कोणीही शहरात आले नसल्याचे आतापर्यंतच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
परदेशातून आलेल्यांशी आम्ही संपर्क साधला आहे. त्यांची कोरोना चाचणी केली असून, घरातच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. त्यांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल शनिवारी मिळतील. त्यातून कोरोनाबाधित आढळणाऱ्यांचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ केले जाईल. - डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी