सांगली : महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेत १२५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. महापालिका सभेत फेरनिविदेचा ठराव होऊनही त्याविषयीची कार्यवाही जाणीवपूर्वक टाळण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते दिगंबर जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. जाधव म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेच्या चुकांमुळे ड्रेनेजची ही योजना अडचणीत सापडली आहे. आर्थिक भ्रष्टाचारामुळे योजनेची वाट लागली आहे. महापालिकेच्या १६ नोव्हेंबर २0१३ रोजीच्या बैठकीत ठराव क्रमांक २३१ द्वारे ड्रेनेज योजनेसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला होता. ठेकेदाराने करारपत्राचा भंग केल्यास प्रशासनाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्याविषयी ठरावात उल्लेख आहे. असे असताना, ही योजना तशीच पुढे संबंधित ठेकेदारांमार्फत सुरू करण्यात आली. जादा दराने या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. प्रसंगी याप्रश्नी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल. आ. पतंगराव कदम यांनी ड्रेनेज योजनेसंदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. सत्ताधारी गटाने या सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. महापालिकेत पतंगरावांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)पृथ्वीराज पाटील यांची चौकशी!राज्य सहकारी संघाची पुण्यातील १५00 कोटी रुपये किमतीची जागा १५ कोटी रुपयांना विकल्याप्रकरणी संबंधित संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. ज्यांच्यावर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा समावेश आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. या प्रकरणात माझे नाव नाही. त्या गोष्टीस आपण विरोध केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रेनेज योजनेत १२५ कोटींचा भ्रष्टाचार
By admin | Published: July 16, 2015 11:16 PM