लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शहरात दोन दिवस डेंग्यूच्या साथीबाबत सर्वेक्षण चालू असून, यामध्ये १२०० घरांमध्ये आठ पथकांद्वारे भेटी दिल्या असून, १३ तापाचे रुग्ण शोधले आहेत.
सर्वांवर औषधोपचार सुरू असून, रुग्ण चांगले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, नगराध्यक्षा सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, घरोघरी सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून, डास अळी सापडल्याने कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत. सर्व घरांची तपासणी करण्यात येणार असून, नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. नगरपंचायतीमार्फत रोज संध्याकाळी धूर फवारणी, पावडर धुरळणी चालू आहे. दोन-चार दिवसांत सर्वेक्षण पूर्ण होईल. हे सर्वेक्षण करताना डॉ. गणेश राजमाने, डॉ. स्वप्नील पवार, आरोग्य सहाय्यक एम. डी. पाटील, उत्तम गायकवाड, राजाराम बागल उपस्थित होते.