सांगली : दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त मागणीनुसार 159 तलावांपैकी 130 तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिले.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, पाटबंधारे विभागाचे विविध विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री ना. शं. करे, सु. मा. नलवडे, प्रशांत कडुसकर, वि. पां. पाटील, सं. कु. पवार, प्र. रा. पाटील, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत उपसा सिंचन योजनांमधून भरून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 159 तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत 130 तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियंमन प्राधिकरण यांनी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 च्या कलम 8 (1) नुसार सांगली जिल्ह्यात अल्पपर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पुढील काळात सद्य स्थितीत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
त्याकरिता विविध उपसा सिंचन योजनांद्वारे सोडण्यात येणारा पाणीसाठा आरक्षित करण्याच्या संदर्भात जत तालुक्यातील 14 जलसाठ्यामधील, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यांतील 61 जलसाठ्यांमधील आणि आटपाडी तालुक्यातील 11 जलसाठ्यांमधील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणी आरक्षित केले आहे, त्या ठिकाणी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पाणी उपसाबंदी करण्याची कार्यवाही करावी. तसेच, सर्व कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तलाव तपासून घ्यावेत व तसा अहवाल सादर करावा, असे त्यांनी सूचित केले.