बुधगाव : नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्गाविरोधातसांगली जिल्ह्यातून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे २५० अशा एकूण १३११ हरकती २८ मार्चअखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गबाधितशेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले. महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कवलापूर (ता. मिरज) येथे झाला. यावेळी समितीचे कांबळे म्हणाले, या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरु करणे अनाकलनीय आहे. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील.कांबळे म्हणाले, हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकऱ्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सामाजिक सलोखाही तुटणार आहे. या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होणार आहेत. त्यामुळे तो रद्द करावा.दरम्यान, सुनावणीदरम्यान शेतकऱ्यांचा एकसंधपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. घनशाम नलावडे, राहुल जमदाडे, प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी आभार मानले.
संघर्षाचा केंद्रबिंदू कवलापूरशक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कवलापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कवलापूर येथेच राहील असा निर्णय झाला. घनशाम नलावडे (सांगली), सागर बिले (सोलापूर), दिलीप खोत (कोल्हापूर) यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या.