शिरवळ : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावाचा, नाय डॉल्बीचा’ या चळवळीला शिरवळ पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात यश आले आहे. शांतता कमिटीच्या बैठकीत शिरवळ पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव व औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेल्या केसुर्डी गावच्या एकूण १४ गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात डॉल्बीमुक्तीचा नारा दिला आहे. ‘गणेशोत्सव हा मांगल्याचा सण असून, गणेश मंडळांनी पारंपरिक सण साजरा करत असताना सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव हा आनंदाचा सण असून, डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे आनंदाच्या सणावर विरजन पडून डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम समोर येताना दिसत आहेत. यासाठी गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवावी,’ असे आवाहन शिरवळचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांनी केले होते. नायगाव व केसुर्डी याठिकाणी शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. त्यामध्ये १४ गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्तीचा नारा दिला. याप्रसंगी नायगावचे सरपंच मनोज नेवसे, ग्रामपंचायत सदस्य मेघनाथ नेवसे, निखील झगडे, सुधीर नेवसे, अजय जमदाडे, सिंधू नेवसे, पांडुरंग नेवसे, तंटामुक्त अध्यक्ष बबन नेवसे, बाबासो नेवसे, अमित कानडे, अमित नेवसे, मारुती नेवसे, केसुर्डी सरपंच संगीता तांबे, उपसरपंच आनंदा ढमाळ, रवींद्र ढमाळ, प्रमोद जाधव, प्रदीप बांदल, विनायक ढमाळ, गणेश खडसरे, विशाल ढमाळ, संतोष ढमाळ, जगन्नाथ शेंडगे, अण्णा ढमाळ, संतोष तांबे, सागर ढमाळ, सूर्यकांत चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक भोईटे, हवालदार राजू अहिरराव, संतोष ननावरे, रमेश वळवी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) शिरवळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबविण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. निर्णय घेतलेल्या या गणेश मंडळांचा सन्मान करण्यात येणार आहे. - संभाजीराव म्हेत्रे, पोलिस निरीक्षक
१४ गणेश मंडळांचा डॉल्बीमुक्तीचा नारा
By admin | Published: August 28, 2016 11:59 PM