सांगली : ऊसतोड मजुरांची टोळी पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडी (ता. मिरज) येथील बाळासाहेब सुरगोंडा पाटील यांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आबासाहेब नामदेव राठोड (वय ३५, रा. गायरान तांडा, माळसजवळा, जि. बीड) या ठेकेदाराविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळासाहेब पाटील सावळवाडीत कुटुंबासह राहतात. त्यांचा शेतीसह ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. हा ट्रॅक्टर ते ऊस वाहतुकीसाठी वापरतात. २०१८-१९ या वर्षात ऊसतोडणी कामगार पुरविण्यासाठी त्यांनी संशयित आबासाहेब राठोड याच्याशी संपर्क साधला.
२८ मे २०१८ रोजी राठोड सांगलीत आला. ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी त्यांच्यात १४ लाख रुपयांचा सौदा ठरला. तसेच त्याला दहा कोयतेही देण्याचे ठरले. ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी करार झाला. दि. ८ मे ते ५ जून २०१८ या कालावधित पाटील यांनी सहा टप्प्यात राठोडच्या बँक खात्यावर १४ लाख रुपयांची रक्कम जमा केली. पण करारात ठरल्याप्रमाणे राठोडने ऊसतोड मजूर पुरविले नाहीत.
पाटील यांनी त्याच्याशी संपर्क साधला, मात्र तो टाळाटाळ करू लागला. पाटील यांनी बीडमध्ये जाऊन त्याची भेट घेतली असता, पैसे परत करतो, असे त्याने सांगितले. परंतु त्याने पैसे दिलेच नाहीत. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो पाटील यांचा फोनही घेत नाही. त्यामुळे पाटील यांनी मंगळवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.मुलांचे अपहरणगेल्याच आठवड्यात ऊसतोड मजुरांची टोळी पुुरविण्याच्या आमिषातून बीडमधील दोन ठेकेदारांनी एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण सांगलीत उघडकीस आले होते. पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने ऊसतोड ठेकेदारांच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले होते.
याप्रकरणी सात जणांना अटक केली होती. या दोन मुलांना महिनाभर डांबून ठेवून मारहाण केली होती. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उजेडात आले होते.