सांगली : शहरासह तासगाव, आटपाडी, सोलापूर जिल्ह्यातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) येथील तिघांच्या टोळीस तासगावमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ८५ हजारांच्या १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. चैनीसाठी तरुणांनी दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी अमित दीपक मोहिते (वय १९), लक्ष्मण शहाजी चव्हाण (२१), विजय सुखदेव निळे (२२, सर्व रा. करगणी, ता. आटपाडी) यांना अटक करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभर कडक बंदोबस्त तैनात केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तासगाव शहरात गस्तीवर हाेते. यावेळी विना क्रमांकाच्या दोन दुचाकी घेऊन तिघेजण तासगाव शहरातील चौकात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली. सांगली, तासगाव, सांगाेला व माळशिरस येथून मोटारसायकली चोरल्याचे त्यांनी सांगितले.
चोरी केलेल्या सात मोटारसायकली अमित मोहिते याच्या घराजवळ, तर पाच मोटारसायकली निळे याच्या घराजवळ मिळून आल्या. चोरी केलेल्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले. संशयितांकडून सहा लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १४ मोटारसायकली जप्त करत आटपाडी पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवीराज फडणीस, अभिजित सावंत, अच्युत सूर्यवंशी, सतीश आलदर, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिंगरे, शशिकांत जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
चैनीसाठी चोरीचे प्रकार
एलसीबीच्या पथकाने अटक केलेले तिघेही तरुण असून, चैनीसाठीच त्यांनी दुचाकी चोरल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------
फोटो ०१ सिटी ०१ नावाने एडीटोरीयल