सांगली : केरळमध्ये महापुराच्या आपत्ती निवारणासाठी आता सांगली जिल्ह्यानेही पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी सोमवारी केरळला मदत पाठविण्याबाबत आवाहन केले आणि केवळ काही तासातच १४ टन खाद्यपदार्थ व तीन लाखाहून अधिक निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला. विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी बिस्किटे, दूध पावडर, भडंग घेऊन पहिला ट्रक रवानाही झाला. मंगळवारी आणखी मदत पाठविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी समाजमाध्यमांतून केरळमधील नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यात कपडे व इतर साहित्य न देता केवळ पाकीटबंद खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून बिस्किट, दूध पावडर आणि भडंग अशा १३ हजार ९७० किलो अन्नपदार्थांचे बॉक्स प्रशासनाकडे जमा झाले. मदतीच्या संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला होता. तालुका पातळीवरही मदतीच्या संकलनासाठी मोहीम राबविण्यात आली.
सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी काळम पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत घेऊन जाणारा पहिला ट्रक पुण्याकडे रवाना झाला. पुणे येथून हा माल केरळला जाणार आहे. चितळे उद्योग समूहाने दूध पावडर, बाकरवडी आणि भडंग दिला. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनीही यावेळी बिस्किटांचे बॉक्स जमा केले. निधी संकलनातही सोमवारी ३ लाख २१२ रुपये धनादेश व डीडीच्या स्वरूपात जमा झाले. यात खा. संजय पाटील यांनी ५१ हजार रूपये, हुतात्मा उद्योग समूहाने २५ हजार रूपये जमा केले.निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.केरळच्या पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांची मदतआटपाडी : केरळमधील पूरग्रस्तांसाठी आटपाडीकरांनी ८२ हजार रुपयांसह एक टनाहून अधिक बिस्किटे जमा केली. यावेळी गावातून फेरी काढून मदतीचे आवाहन करण्यात आले. केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. यात ३५० हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यात जीवित हानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आटपाडीकर सरसावले आहेत. बिस्किटे व आर्थिक मदत करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत फेरी काढण्यात आली. यावेळी एकूण १०७० किलो बिस्किटे, तसेच रोख २००१७ रुपये जमा झाले. तसेच राजेंद्र शिवाजी पाटील यांनी ५१ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, तर आटपाडी शहर डॉक्टर असोसिएशनकडून ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अशी एकूण ८२ हजाराची रक्कम जमा झाली.मिरजेतून केरळच्या पूरग्रस्तांना मदत
मिरज : मिरजेहून केरळ येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मिरजेतून औषधे, ब्लॅँकेट व खाद्यपदार्थ पाठविण्यात आले. सेवासदन रुग्णालयातील वैद्यकीय तंत्रज्ञ पॉल चॉको मिरजेतून रेल्वेने मदत घेऊन रवाना झाले. डॉ. रविकांत पाटील, डॉ. पाठक, मोहसीन बागवान, इस्माईल बेपारी, गौरव कोळ्ळोळी, बेला मानकर, सद्दाम शेख, सुनील मोरे, हर्षल, साजन यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली.