वारणावती : जिलेटीन (सुरुंग)च्या केपच्या वायरला मोबाईल बॅटरी जोडल्याने त्याचा स्फोट होऊन येसलेवाडी (ता. शिराळा) येथील करण तुकाराम येसले (१४) हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येसलेवाडी (ता. शिराळा) येथील करण येसले व त्याचे काही मित्र गुरुवारी सायंकाळी माळरानावर खेळत हाेते. यावेळी गावाशेजारील झुडुपात त्याना जिलेटीन सुरूंग कांड्या मिळून आल्या. त्यानी या कांड्या घरी आणल्या. रात्री आठच्या सुमारास करणसह सात-आत मित्र एकत्र येऊन कट्ट्यावर बसले होते. त्यांनी गमतीने उत्सुकतेतून जिलेटीन कॅपच्या दोन तारा मोबाईलच्या बॅटरीला जोडल्या. क्षणार्धात मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की जखमी करणच्या जबड्याला मोठी इजा झाली. वरच्या जबड्याचे दात तुटून मोठी जखम झाली. त्याच्या भाेवताली बसलेली अन्य मुलेही किरकाेळ जखमी झाली.