विटा : विटा नगरपरिषदेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा तब्बल १४० कोटी ३ लाख ४७ हजार ५६५ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनी प्रशासकीय सभेत मंजूर केला. या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी भुयारी गटर योजना प्रकल्पासाठी ११ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.विटा नगरपरिषदेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात मंगळवारी प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विटा नगरपरिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी घरपट्टी करापासून ६ कोटी ५५ लाख २२ हजार २५० रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. पाणीपट्टी करापासून ४ कोटी ५० लाख, मालमत्ता व फी पासून ४ कोटी १० लाख ६३ हजार ५००, महसुली अनुदानातून १९ कोटी ६२ लाख ७२ हजार ६५ तर भांडवली अनुदानातून ५३ कोटी १० लाख ९० हजार असे एकूण विविध करापासून १२१ कोटी ५८ लाख ५३ हजार २९५ रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.या अर्थसंकल्पात विटा शहर विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन रस्ते कामासाठी १ कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी ७५ लाख, भुयारी गटर योजनेसाठी ११ कोटी, सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी ४ कोटी ८० लाख, आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेसाठी ६ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच पंतप्रधान आवास योजनेसाठी ५ कोटी ६० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी ५ कोटी ५० लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १ कोटी ८५ लाख, नागरी दलितेत्तर योजनेसाठी १ कोटी, पंधरावा वित्त आयोग ५ कोटी ५० लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी ९६ लाख, स्वच्छ भारत सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान कामासाठी ४ कोटी १० लाख, रमाई आवास योजना घरकूलसाठी २५ लाख ५० हजार, विशेष रस्ता अनुदान ५ कोटी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठोक अनुदान १ कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ४५ लाख,गटर व शौचालय बांधकाम दुरुस्तीसाठी १ कोटी २५ लाख, हरित पट्टे विकसित करण्यासाठी ५ लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियान सांडपाणी व मलनि:सारण योजनेसाठी ३ कोटी २० लाख, महिला व बालकल्याण विकास कार्यक्रम, दिव्यांग कल्याण कार्यक्रम व सामाजिक दुर्बल घटक यासाठी प्रत्येकी १५ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.
विटा नगरपरिषदेचा १४० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाला. या अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा अर्थसंकल्प नगरपरिषदेच्या विकास कामांना प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. - डॉ. विक्रम बांदल, प्रशासक
सर्वसमावेशक भूमिका घेत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाकरता महत्त्वाचा असून विकासाला चालना देण्यासाठी ही नगरपरिषद अग्रेसर ठरली आहे. - विक्रमसिंह पाटील, मुख्याधिकारी.