मिरज : प्रवाशांकडून आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या घटना वाढत आहेत. पुणे विभागात एप्रिल ते मार्च २०२३ या वर्षात १४०४ वेळा विनाकारण साखळी खेचून रेल्वे थांबविण्याचे प्रकार घडले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करुन ११६४ जणांना अटक करण्यात आली. तीन लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेत आपत्कालीन कारणासाठी गाडी थांबवण्यासाठी साखळीचा पर्याय आहे. मात्र त्याचा गैरवापर सुरु आहे. स्थानकातून गाडी सुटत असताना प्रवासी पोहोचणे, थांबा नसलेल्या स्थानकांवर उतरणे किंवा चढणे अशा किरकोळ कारणांसाठी साखळी ओढून गाडी थांबवली जाते. त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. रेल्वे उशिरा धावल्याने प्रवाशांची गैरसोय होते. एखाद्या प्रवाशाच्या चुकीमुळे इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
पुणे विभागात प्रवाशांनी अनावश्यक साखळी ओढू नये यासाठी उदघोषणा केल्या जातात. रेल्वेत सूचना फलकही लावले आहेत. तरीही विनाकारण साखळी ओढण्याचे प्रकार थांबलेले किंवा कमी झालेले नाहीत. उलट अशा घटना वाढतच आहेत. किरकोळ व अनावश्यक कारणासाठी आपत्कालीन साखळीचा वापर करणे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी गाडी सुटण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर रेल्वे स्थानकात पोहोचावे, क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळीचा गैरवापर टाळावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.