प्रताप महाडिककडेगाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाने सिंचन वर्ष २०२१-२२ मध्ये टेंभू, कृष्णा कालवा, आरफळ कालवा प्रकल्पातून ८.७० टीएमसी पाणी उचलले. या याेजनांमधून सध्या ६३ हजार ४०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यासाठी सिंचन व बिगर सिंचनाचे एकूण १२.३२ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात १४.८९ कोटी रुपये विक्रमी वसुली करून व्यवस्थापनाने उद्दिष्टाच्या १२१ टक्के वसुली केली आहे.टेंभू उपसा सिंचन योजना ५ टप्प्यांमध्ये कार्यान्वित आहे. कृष्णा कालवा व आरफळ कालवा गुरुत्व पद्धतीने चालणाऱ्या योजना आहेत. यामुळे या योजनांसाठी वीज बिलाचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र टेंभू योजनेसाठी एकूण ५ टप्प्यांमध्ये पाणी उचलून ४५० किलाेमीटर लांबीच्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी वीजबिलाचा खर्चही मोठा आहे.योजना साधारणपणे सहा महिने चालते. दर महिन्याला ६ ते ७ कोटी रुपये वीजबिल येते. एकंदरीत ६ महिन्यांचे ४० कोटी रुपये वीजबिल भरावे लागते. ८१ /१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिल राज्य शासन भरते तर १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून योजनेचा वीजपुरवठा खंडित हाेण्याची नामुष्की ओढवू शकते. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन या वर्षी योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला.कृष्णा प्रकल्पांतर्गत कण्हेर धरणापासून निघणारा डावा कालवा कृष्णा नदीस जेथे छेदतो तेथून पुढे आरफळ कालवा चालू होतो. त्याची एकूण लांबी १९२ किलाेमीटर आहे. या विभागाकडे आरफळ कालव्याचे १०२ ते १९२ किलाेमीटर व पलूस शाखा कालव्याचे १ ते ३३ किलाेमीटरपर्यंतचे सिंचन व्यवस्थापन आहे. आरफळ कालव्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील खानापूर, पलूस, तासगाव व कडेगाव तालुक्यांना ३.८३ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. त्यानुसार निर्मित सिंचन क्षेत्र १५९८६ हेक्टर आहे.कृष्णा कालव्याची खोडशी फुगवटा व वसगडे बंधाऱ्यासह एकूण लांबी ८६ किलाेमीटर आहे. याद्वारे सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यांना २.७० टीएमसी पाणी मिळते. त्यानुसार निर्मित सिंचन क्षेत्र १३ हजार ३६६ हेक्टर आहे. येथेही पाणीपट्टी आकारणी व वसुली सक्षमपणे होत आहे.
३५ टक्के कर्मचारी; १२१ टक्के उद्दिष्टपूर्ती
टेंभू, कृष्णा कालवा आणि आरफळ या तीनही प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी एकूण मंजूर पदांपैकी फक्त 30 ते ३५ टक्केच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यामुळे उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण आहे. तरीही कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रमी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले.
साखर कारखान्यांचे सहकार्य : राजन रेड्डीयार
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये एकूण ९ मोठे साखर कारखाने आहेत. पाणीपट्टी वसुलीसाठी या कारखान्यांकडून मोठे सहकार्य होत आहे, हे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टेंभू योजनेची पाणीपट्टी कपात करून रक्कम योजनेकडे वर्ग करतात. यामुळे योजना सक्षमपणे चालविण्यास मदत होत आहे, असे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार सांगितले.