भिलवडी : खासदार संजयकाका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिलवडी कृष्णा नदीकाठी असणाऱ्या घाटाच्या विकासकामांसाठी दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी दिली.
ते म्हणाले पूर्वीची जुनी संरक्षक भिंत दुरुस्त करणे, पथ मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीवरील पूल ते कृष्णाघाट यादरम्यान नवीन पूरसंरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.
कृष्णेला येणाऱ्या महापुराचे पाणी भिलवडी गावात शिरते. यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या दरम्यान पूर संरक्षक भिंत बांधून पुराचा धोका टाळता येऊ शकतो, अशी भिलावडीकरांची मागणी होती. याबाबत सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह परिवर्तन पॅनलने खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीनुसार त्यांनी भिलवडी गावास जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर करून दिला आहे. याचा फायदा कृष्णा काठालगत राहणाऱ्या कुटुंबांना होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी या घाट परिसरास भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.
फोटो- 05bhilwadi01
फोटो ओळ : भिलवडी कृष्णा घाट परिसरात सुरू असलेल्या कामाची जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाहणी केली.