शिवांजली व ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी पोहोचले हंगेरीत, लवकरच मायदेशी परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:17 PM2022-03-03T12:17:40+5:302022-03-03T12:18:16+5:30
आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्बचे कानठीळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता.
प्रताप महाडीक
कडेगाव : यूक्रेनच्या खारकिव्ह शहरातून धाडसाने बाहेर पडत हंगेरी बॉर्डरच्या दिशेने निघालेले शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित पोहोचले आहेत. तब्बल १५५० किमी अंतराच्या रेल्वे प्रवासानंतर ते बुडापेस्ट शहरात पोहोचले.
कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील या दोघी युक्रेनमधील खारकिव्ह शहरात आडकल्या होत्या. मात्र रशियाचे हल्ले तीव्र झाल्याने त्यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थ्यांनी धाडसाने खारकिव्ह शहर सोडले आणि जीव मुठीत घेऊन हंगेरीत पर्यंतचा थरारक प्रवास केला. आम्ही सुरक्षित बुडापेस्ट शहरात सुरक्षित पोहोचलो आहे असे शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शिवांजली म्हणाली, खारकिव्ह येथून मंगळवारी सकाळी जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर पडलो. रेल्वेने प्रवास करीत असताना युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह पासून पुढे जाई पर्यंत भीतीचे वातावरण होते. रशियाकडून युक्रेन मधील खारकिव्ह आणि राजधानी असलेल्या किव्ह शहरावर हल्ले सुरू आहेत. अशा स्थितीत किव्ह शहरातून रेल्वे पुढे जाईपर्यंत मनात खूप भीती होती. आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्बचे कानठीळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता.
मात्र आम्ही एकमेकांना दिलासा देत धाडसाने तो थरारक प्रवास करीत होतो. मंगळवारी सायंकाळी लिव्ह रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यावर तेथे उतरून या काही तास पुढील रेल्वेची प्रतीक्षा करीत होतो. लिव्ह मध्येही हल्ले सुरू होते त्यामुळे भीती कायम होती. तेथून काही वेळाने दुसऱ्या रेल्वेने युक्रेनमधील चॉप शहराकडे प्रवास सुरु केला आणि आम्हाला दिलासा मिळाला. चॉप रेल्वे स्थानकात उतरल्यावर थोडेसे सुरक्षित वातावरण वाटले.
युक्रेनमधील चॉप शहरापासून २४५ किमी अंतरावर हंगेरी बॉर्डरवर रेल्वे पोहचल्यावरच आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. रात्री उशिरा बुडापेस्ट या शहरात आम्ही पोहोचलो. आता आम्ही भारतीय दूतावास व भारत सरकारच्या मदतीने सुरक्षित मायदेशी पोहोचणार आहोत असा विश्वास शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी व्यक्त केला.