कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील बाफना कोल्डस्टोअरेजमधील १५ लाखांचा ९ हजार ५७५ किलो बेदाणा भरलेला ट्रक एकाने बेपत्ता केला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व ट्रकमालकास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने उत्तर प्रदेशातील उरई येथे अटक केली.
आशिष शिवकुमार चतुर्वेदी (वय ३२, रा. मुरली मनोहर मोहल्ला, जालोन, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सावळी (ता. मिरज) येथील राम कॅरिंग ट्रान्स्पोर्टमार्फत बाफना स्टोअरेजमधून ६९५ बेदाणा बॉक्स कानपूरकडे रवाना करण्यासाठी ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापकाने ट्रकचालक कमलजितसिंग याचा ट्रक (एम. पी. ०७- एचबी ५७६२)भाड्याने ठरवला होता. बेदाणा भरुन २३ सप्टेंबरला ट्रक पाठविण्यात आला होता. परंतु तो माल मिळाला नसल्याचे लखनौच्या व्यापाऱ्याने एक आॅक्टोबरला ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापकांना सांगितले होते.
ट्रकचालक, क्लिनर, मालक यांचा संपर्क होऊ शकत नसल्याने मुकेश तसेमसिंग सलारिया (सांगली) यांनी तिघांविरोधात कुपवाड पोलिसात ५ आॅक्टोबरला तक्रार दिली होती. दरम्यान, संशयित आशिष चतुर्वेदी याने ट्रकचालक, क्लिनर यांच्या संगनमताने १५ लाखांचा बेदाणा लंपास केला होता. कुपवाड पोलीस ठाण्यातील हवालदार राजू बोंद्रे, संजय पावरा यांनी सायबर सेलच्या मदतीने मंगळवारी उत्तर प्रदेशमधील उरई या ठिकाणी सापळा रचला होता. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याला गुरुवारी कुपवाडमध्ये आणण्यात आले. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलीस कोठडी दिली. हवालदार राजू बोंद्रे तपास करीत आहेत.