मिरज : बेडग (ता. मिरज) येथील आंबेडकरी समाजातील सुमारे १५० कुटुंबांनी मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कुच केली. निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना करणार आहेत.बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीने एक महिन्यांपूर्वी जमीनदोस्त केली. यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती. मात्र, ती बेकायदा असल्याचे ठरवून १६ जून रोजी कमान पाडून टाकली. जिल्हाभरातील आंबेडकरी जनतेने याचा तीव्र निषेध केला. कमान पाडल्यापासून गावातील वातावरण धगधगते असून वार-प्रतिवार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात मिरजेत समाजाची बैठक झाली. त्यामध्ये निर्णायक आंदोलनाचा निर्णय झाला. मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सकाळीच मोठ्या संख्येने आंबेडकरी महिला-पुरुष निघाले आहेत. काही वाहनांमध्ये महिला, मुले व आंदोलकांच्या साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठोस निर्णय मिळाल्याशिवाय गावाकडे परतायचे नाही या भूमिकेतूनच आंदोलक मुंबईसाठी रवाना झाल्याचे दिसून आले. कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते, मात्र प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त समाजाने थेट गाव सोडण्याचाच निर्धार केला. त्यानुसार लॉंग मार्च सुरु झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेऊन तोडग्याचा प्रयत्न केला, पण तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी मुलेबाळे, अंथरुण-पांघरुण, कपडे व संसारोपयोगी साहित्यासह गाव सोडले आहे. भर पावसात त्यांची पायपीट सुरु झाली आहे.
मिरजेत निळे वादळबेडगमधून दुपारी बाराच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात जथ्था गावाबाहेर पडला. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त होता. दुपारी तीन वाजता आंदोलक मिरजेत पोहोचले. निळे ध्वज फडकवत महिला, मुले अग्रभागी होती.
पालकमंत्री, खासदारांचा प्रशासनावर दबावग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप आंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला. ते समाजबांधवांवर अन्याय करत असल्याची तक्रार केली. खाडे यांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आमरण उपोषण सुरू केल्यानंतर जनसुराज्य वगळता कोणत्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना भेटण्याचीही तसदी घेतली नसल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.