इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या १५ दिवसांत १५० जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील १२९ जण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत, तर २१ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यात ५७८५ रुग्णसंख्या असून, त्यातील ५३७२ रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ९४.५४ टक्के आहे. २६३ जणांच्या मृत्युमूळे मृत्युदर ४.७१ आहे.
पाच महिन्यांनंतर कोरोना विषाणूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. १५ दिवसांत तालुक्यात रुग्णांची संख्या १५० वर पोहोचली आहे. तीन शासकीय रुग्णालयासह आठ खासगी रुग्णालयात एकूण ५०१ बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. यातील १७० बेड शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. सध्या ग्रामीण भागात ११४, तर इस्लामपूर आणि आष्टा शहरात ३६ कोरोना बाधितांची नव्याने नोंद झाली आहे.
आरटीपीसीआर आणि अँटिजेन तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. १७ हजार ७४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लसीकरण करण्यात आले असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.