लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : शहराचे शिल्पकार लोकनेते स्व. हणमंतराव पाटील यांची जयंती व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटा शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम सुरुवात झाली. शहरात सुमारे १५ हजार झाडांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाबरोबरच राज्य शासनाने या अभियानास पूरक असे माझी वसुंधरा अभियान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत विटा शहरातील स्वच्छतेसह शहर व परिसरात वृक्षारोपण मोहीम सुरू होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विटा नगरपरिषदेने लोकनेते स्व. हणमंतराव पाटील यांची जयंती व माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. माझी वसुंधरा अभियानास विटा शहरात गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे.
या वृक्षारोपणानंतर त्या वृक्षांची देखभाल, खत, पाणी व वृक्षारोपण झालेली सर्व झाडे जगली पाहिजेत. यासाठी विशेष योजना तयार केली आहे. यासाठी थर्ड पार्टी एजन्सी नेमून त्यांच्यावर या वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जगलेल्या व वाढलेल्या सर्व झाडांच्या संख्येनुसार त्या एजन्सीला मोबदला देण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोहिमेसाठी छोटी झाडे खरेदी न करता किमान पाच फुटांपेक्षा मोठी झाडे वृक्षारोपणासाठी खरेदी केली जात आहेत. त्यामुळे या सेवाभावी व सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमास विटेकर नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी अतुल पाटील, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, अविनाश चोथे, फिरोज तांबोळी, कार्यालयीन अधीक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, योगेश साळुंखे, राजकुमार पाटील, सलीम शेख, अस्लम शेख, सचिन महापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.