राहुल संकपाळउमदी : गावातील आश्रमशाळा तशी नावाजलेली. यंदा अर्धशतकी वाटचाल या आश्रमशाळेने पूर्ण केली. ऊसतोड मजूर, कामगार, कष्टकरी वर्गातील, गरीब कुटुंबातील मुले याठिकाणी राहतात अन् शिक्षणातून मोठी होतात. शिस्तबद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या आश्रमशाळेत रविवारी रात्री अघटीत घडले. विषबाधेने आश्रमशाळा हादरली. विद्यार्थ्यांचा सोमवारचा दिवस उजाडला तो थेट रुग्णालयातच. सैरभैर पालक, आरोग्य यंत्रणेची धावाधाव, वेदनांनी बेजार झालेली मुले, असे सारे चित्र अस्वस्थ करणारे होते.उमदीतील समता आश्रमशाळेच्या लगतच संस्थाप्रमुखांनी विविध कार्यक्रमांसाठी सभागृह उभारले आहे. याच सभागृहात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. संस्थाचालकांच्या घरातला कार्यक्रम असल्याने दोन हजारांवर लोकांसाठी जेवण केले. त्यात आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणाचेही नियोजन केले होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम चालला. त्यानंतर आश्रमशाळेतील मुलांना जेवण देण्यात आले. पटांगणात सायंकाळी सहा वाजता जेवणाची पंगत बसली. दुपारचे जेवण सायंकाळी मुलांच्या पोटात गेले. रात्र होताच जेवण बाधल्याची लक्षणे दिसू लागली. एका पाठोपाठ मुले पोटातील वेदनेने विव्हळू लागल्यानंतर आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाने आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. मुलांना विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसल्यानंतर गंभीर मुलांना मिरज, सांगलीला तर किरकोळ बाधितांना आरोग्य केंद्रात उपचाराला ठेवण्यात आले. रविवारची संपूर्ण रात्र यंत्रणांची धावपळ सुरू होती. पालकही अस्वस्थपणे फिरत होते. सोमवारचा दिवसही अशाच अस्वस्थ धावपळीत गेला.
संस्थाचालक, आश्रमशाळेतील शिक्षकांची तत्परताजेवण बाधल्याचे लक्षात येताच आश्रमशाळेतील शिक्षकांनी याची कल्पना आरोग्य यंत्रणेला देतानाच शिक्षण संस्थाचालकांनाही बोलावले. त्यांनीही तत्परता दाखवत मुलांच्या उपचारासाठी धडपड केली. त्यामुळे मुलांच्या प्रकृतीला मोठा धोका उद्भवला नाही.
आश्रमशाळेबाहेर पालकांच्या अस्वस्थ फेऱ्याआश्रमशाळेच्या बाहेर सोमवारी सकाळी पालकांच्या अस्वस्थ फेऱ्या सुरू होत्या. मुलांना कोणत्या रुग्णालयात दाखल केले आहे, याची माहिती घेऊन त्यांची मुलांना भेटण्यासाठी धावाधाव सुरू होती.
रुग्णवाहिका थांबूनसोमवारी सकाळीही सुमारेे २० मुलांना त्रास सुरू झाला. त्यांनाही रुग्णालयात हलविण्यात आले. दिवसभर रुग्णवाहिका आश्रमशाळेच्या आवारात थांबून होती. कोणाची प्रकृती बिघडली तर तातडीने त्यांना उपचार देता यावेत, याची सोय केली होती.
आरोग्य यंत्रणा जागीउमदीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही मुलांना जत व कवठेमहांकाळ येथेही उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जास्त गंभीर असलेल्या मुलांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्ह्याच्या पूर्व भागातील माडग्याळ, उमदी, जत व कवठेमहांकाळ व मिरज येथील आरोग्य यंत्रणा पहाटे पाच वाजेपर्यंत राबत होती.
शासकीय अधिकारी, पोलिसांकडून तपासतालुका आरोग्य अधिकारी, पोलिस उपअधीक्षक, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांनी आश्रमशाळेला भेट देत घटनेची चौकशी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी १० वाजता वसतिगृह कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेत कार्यालय सील केले.
मोठे अधिकारी घडविणारी आश्रमशाळा
उमदीच्या आश्रमशाळेत महाराष्ट्र, कर्नाटकातील मुले शिकतात. याठिकाणी शिकून अनेकजण अधिकारी झाले. महाराष्ट्र व कर्नाटक प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर अनेकजण कार्यरत आहेत.
दुपारी जेवलेल्या लोकांनाही अन्नपचन झाले नाही. विद्यार्थ्यांना प्रेमापोटी नेहमीच जेवण दिले जाते. त्याचपद्धतीने आताही जेवण दिले होते. या घटनेने आम्हालाही वेदना झाल्या. हा प्रकार कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. -एस. के. होर्तीकर, सचिव, सर्वोदय शिक्षण संस्था
गावातील काही नागरिकांनाही अन्नपचनाचा त्रास झाला आहे. या घटनेबाबत कोणताही संशय घेण्याचे कारण नाही. गावात असा प्रकार कधीही घडला नाही. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याबाबत आम्हाला समाधान वाटते. - मुत्तू ऊर्फ धुडाप्पा तेली, सरपंच, उमदी
प्रथमदर्शनी अन्नातून बाधा झाल्याचे दिसून येते. तरीही चौकशी करून संपूर्ण वैद्यकीय अहवाल आम्ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. - राहुल पवार, वैद्यकीय अधिकारी, उमदी