घनशाम नवाथे/ सांगली : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरूवारी मध्यरात्रीनंतर राबवलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मध्ये पाहिजे असलेले ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी पकडण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले. दोन हद्दपार आरोपींवर कारवाई केली. तसेच १५१ वाहनांवर कारवाई करून एक लाख ४० हजार रूपये दंड केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही माहिती दिली.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीमध्ये गुरूवारी मध्यरात्रीनंतर कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरूवारी रात्री ११ वाजता नाकाबंदी, कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशनला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे तीन पर्यंत ही कारवाई सुरू होती.
ऑपरेशन दरम्यान आर्म ॲक्ट, पाहिजे व फरारी आरोपी, अजामिनपात्र वॉरंट, हद्दपार आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सर्व उपअधीक्षक, २५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची पथके सहभागी झाली होती. ४२ पोलिस अधिकारी आणि २१९ अंमलदारांची नियुक्ती केली होती.
कारवाईत पाहिजे असलेले ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी यांना ताब्यात घेतले. अजामिनपात्र वॉरंटमधील ४४ आरोपींवर कारवाई केली. चार अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई केली. रेकॉर्डवरील ८६ आरोपींची तपासणी केली. हद्दपारीचा भंग केलेल्या दोघांवर कारवाई केली. नाकाबंदीमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार १५१ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांना १ लाख ४० हजार रूपये दंड करण्यात आला.