अशोक डोंबाळे,सांगली : पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७८२ शेतकऱ्यांच्या १६ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी फळपिकांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाजाचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका फळपिकांना बसला आहे.
जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते दि.१ डिसेंबर या कालावधीत संततधार पाऊस झाला होता. ढगाळ हवामानही असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला होता. काही द्राक्षांचे मणी सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आणि संघटनांच्या दबावामुळे कृषी विभागाने तातडीने नजर अंदाजचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील सर्वाधिक नऊ हजार ७९२ शेतकऱ्यांचे जिरायत पिकाचे ७६० हेक्टर, बागायत पिकाचे १८७ हेक्टर, फळपिकांचे चार हजार ४८७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील दोन हजार २५० शेतकऱ्यांचे ८०८.९५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, भाजीपाला, केळीच्या भागांचे नुकसान झाले.
पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाजचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. पण, शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात कधी मिळणार, असा सवालही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.