संतोष भिसेसांगली : शेतकऱ्यांना परदेशी शेतीचा अभ्यास व्हावा, तेथील प्रयोग राज्यातही केले जावेत, या हेतूने शासनाने परदेशात कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांची निवड केली; पण आठ महिन्यांनंतरही परदेशात जाणाऱ्या विमानाने उड्डाण केलेले नाही. राज्यभरात १६० शेतकरी युरोप दौऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.परदेशी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पुरवठा साखळी यांची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागातर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. ही योजना काही वर्षे बंद होती. सन २०२४ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. त्यासाठी कृषी विभागाच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. फेब्रुवारीत सोडतीद्वारे पात्र शेतकरी निवडले गेले. सांगली जिल्ह्यात पाच, तर राज्यभरात १६० शेतकऱ्यांची यादी निश्चित झाली.दौऱ्याचा सुमारे एक लाख रुपये खर्च शासन करणार असून, उर्वरित लाखांचा खर्च शेतकऱ्याने करायचा आहे. यंदाच्या दौऱ्यासाठी युरोपीय देशांची निवड करण्यात आली आहे; पण सोडत निघून आठ महिने झाले, तरी शासनाचे विमान अद्याप जमिनीवरच आहे. या योजनेत सातत्य नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
१५ हजारांचा भुर्दंडपरदेश दौऱ्याला पात्र ठरण्यासाठी पारपत्र व विमा सक्तीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च केला. विमा व पारपत्र जोडून दौऱ्यासाठी अर्ज केला. आता दौराच अनिश्चित असल्याने १५ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे त्यात सातत्य असायला हवे. आम्ही युरोप दौऱ्यासाठी पात्र ठरलो असून प्रवास सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. शासनाने त्वरित नियोजन करण्याची गरज आहे. - वैभवसिंह शिंदे, पात्र शेतकरी, म्हैसाळ (ता. मिरज)
- परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दौरा निघेल. ही योजना रद्द झालेली नाही. - विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधिकारी