सांगली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. तसेच १७ जनावरांना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर पोहोचली आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश कधी येणार, असा सवाल पशुपालकांमधून उपस्थित होत आहे.अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत. मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार ७५७ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. अद्यापही दोन हजार ८९७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १७ जनावरांचा मृत्यू झाला. या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५३३ जनावरेआजारातून बरी झालेली आहेत.आतापर्यंत बाधित झालेली तालुकानिहास संख्या पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका १२९८, आटपाडी ५९०, पलूस ३६२, वाळवा ७०२, खानापूर ५३०, तासगाव ३६६, कडेगाव १२४, कवठेमहांकाळ २१६, जत ४६८, शिराळा तालुक्यात ६१ अशी एकूण चार हजार ७५७ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
सांगलीत लम्पीने घेतला दिवसात १७ जनावरांचा बळी, बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 2:21 PM