सांगली : जुन्या पेन्शनसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, रिक्त पदे भरा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी, शिक्षक १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक पी.एन. काळे, डी.जी. मुलाणी यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. संपासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.राज्य समन्वय समितीने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप केला होता. संपात मध्यस्थी करुन संघटना प्रतिनिधींशी चर्चा करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची लेखी हमी देत आश्वासन दिले होते.अन्य मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून राज्य सरकारला वेळ दिला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सहा महिन्यांत शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील १७ लाख कर्मचारी, शिक्षकांनी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.सांगलीत आंदोलनाची घोषणा करुन त्याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक पी.एन. काळे, डी.जी. मुलाणी, चतुर्थश्रेणी महासंघाचे संजय व्होनमाने, गणेश धुमाळ, नर्सेस संघटना प्रतिभा हेटकाळे, शक्ती दबडे, झाकीरहुसेन मुलाणी, संदीप सकट, मिलिंद हारगे, नीता कोरे, वंदना भोसले, शीतल नगराळे, सुधीर गावडे, विजय तोडकर, सुनील चौगुले, राजेंद्र कांबळे, महेश मोहिते, सतीश यादव, विजय पाटील, सचिन बिरंगे, शैला सावर्डेकर, राहुल नाझरे आदी उपस्थित होते.संप १०० टक्के यशस्वी करणारसर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप १०० टक्के यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती डी.जी. मुलाणी यांनी दिली.
राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर जाणार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा निर्णय
By अशोक डोंबाळे | Published: November 30, 2023 3:41 PM