कवठेमहांकाळ : अंकले (ता. जत) येथे ऐवळे कुटुंबातील सुहासिनीच्या कार्यक्रमात जेवणातून १७ जणांना विषबाधा झाली. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली.विषबाधा झालेल्यांमध्ये विक्रम तुकाराम ऐवळे (वय ३१), लता तुकाराम ऐवळे (वय ४१), संपता कुडलिंग ऐवळे (वय ५५), प्रमिला तुकाराम ऐवळे (वय ३५), प्रसाद तुकाराम ऐवळे (वय ११), चैतन्य सोपान ऐवळे (वय २), निवृत्ती पांडुरंग ऐवळे (वय ३५), पारुबाई पांडुरंग ऐवळे (वय ७०), साक्षी दादासाहेब ऐवळे (वय १६), सीताराम बाबू ऐवळे (वय ७०), राजाबाई अप्पा ऐवळे (वय ७५), अथर्व दादासाहेब ऐवळे (वय १८), स्वाती विनायक ऐवळे (वय ३०), लक्ष्मी सोपान ऐवळे (वय ३० हे सर्वजण रा. अंकले, ता. जत), समर्थ सुनील रोजगे (वय ६), सुरेखा अनिल रोजगे (वय २२), नंदाबाई वसंत रोजगे (वय ५५ हे तिघेही रा. साव, ता. सांगोला) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, अंकले (ता. जत) येथील ऐवळे कुटुंबाच्या घरी गुरुवारी मय्याका देवीच्या सुहासिनीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात सकाळी पोळ्या, आमरससह अन्य असे पदार्थ केले होते. बुधवारी सायंकाळी सुहासिनींनी व पाहुण्यांनी जेवण केले. तसेच अन्य घरातील सदस्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवण केले होते. या सर्वांना जेवणानंतर पोटदुखी, जुलाब तसेच थंडी वाजून आल्याने त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी या सर्वांची प्रकृती गंभीर होती. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात अंकले येथील १७ विषबाधा झालेले रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्या सर्वजणांना आमरसमधून विषबाधा झालेली दिसून येते. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. - डॉ. अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ