कामेरी : कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी १८ कोरोनाबाधित सापडले. यात येडेनिपाणी १२, कामेरी ४, गाताडवाडी व इटकरे येथील १ जणांचा समावेश आहे. गुरुवारी ७१ अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यापैकी १८ बाधित तर ५३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना कामेरी व येडेनिपाणी परिसरात मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अजूनही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जलद गतीने होणे गरजेचे आहे, तरच बाधितांची संख्या आटोक्यात येईल, असे काही दक्षता समिती सदस्यांचे मत आहे. यासाठी आरोग्य विभाग, आशा व अंगणवाडी सेविकांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकच समाधानकारक बाब म्हणजे बाधितांची संख्या वाढत असली, तर मृत्यूदर २.४४ टक्के आहे.
एक फेब्रुवारीपासून १० जूनअखेर दुसऱ्या लाटेत कामेरीतील बाधितांची एकूण ४०९ संख्या झाली आहे. ६१ जण उपचार घेत आहेत. येडेनिपाणी १६० पैकी ४६, विठ्ठलवाडी ६८ पैकी १८, गाताडवाडी ४५ पैकी २१ बाधितांवर गृह विलगीकरणात व ग्रामपंचायतीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.