विटा : येथील प्रकाश शहा या व्यापाऱ्याचा बंगला फोडून चोरट्यांनी अडीच लाखाच्या रोकडसह ४३ तोळे सोन्याचे दागिने व १२ किलो चांदी असा १८ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महावीरनगरमधील मॉडर्न शैक्षणिक संकुलासमोर घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
येथील प्रकाश शहा यांचे पी. रमेशचंद्र नावाने आॅईल विक्रीचे दुकान असून, ते त्यांचे पुत्र अमित चालवतात. महावीरनगरमध्ये त्यांचा ‘सार्थक’ नावाचा दुमजली बंगला आहे. आई, पत्नी, मुलगा, सून व तीन नातवंडांसह येथे राहतात. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास वादळी वारे व पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. शहा कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी प्रथम बंगल्याच्या कुंपणावरून प्रवेश केला.
बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढून ते आत शिरले. खालील बाजूच्या दोन खोल्यांसह वरच्या खोल्यांमध्ये शहा कुटुंबीय झोपले होते, तर रोकड आणि दागिने असलेल्या खोलीत कोणीच नव्हते. चोरटे त्या खोलीत गेले. त्यांनी आतून कडी घातली व कपाटातील रोख अडीच लाख रुपये, ११ लाख ५८ हजार ३०० रुपये किमतीचे ४२ तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख २० हजार रुपये किमतीची १२ किलो चांदीची विविध भांडी, पूजेचे साहित्य असा १८ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
शनिवारी सकाळी पावणेआठला शहा कुटुंबीय उठले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. विटा पोलीस आणि सांगलीचे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. परंतु, त्यांना फारसे यश आले नाही. पोलिसांची दोन पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.वीज गेल्याने साधला डावशहा यांचा शहराच्या मध्यवस्तीत आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानाशेजारी बंगला आहे. वादळी वारे व पावसामुळे वीज गेल्याने अंधार होता. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी ऐवजावर डल्ला मारला.तीन दुचाकी गाड्याही लंपासघटनास्थळापासून शंभर फुटावर डॉ. संदीप वारे यांचे रुग्णालय आहे. त्यासमोर लावण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तीन गाड्याही चोरीस गेल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अंधारामुळे गाड्या घेऊन जाणाºया चोरट्यांचे चेहरे दिसत नाहीत. या दुचाकीही याच चोरट्यांनी लंपास केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.विटा येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री बंगला फोडून ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी विस्कटलेले साहित्य.