विटा : खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ११४ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९४ जागांसाठी १९८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पारे ग्रामपंचायतीसाठी पहिल्यांदाच ११ पैकी ८ सदस्य बिनविरोध झाले आहेत, तर मंगरूळ ग्रामपंचायतीसाठी दोन गटात सरळ लढत होत असून या ग्रामपंचायतीची ४५ वर्षांपासून असलेली बिनविरोधची परंपरा यावेळी खंडित झाली आहे. तसेच खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे.खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक, तर खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. एकूण ११४ जागांसाठी ३४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नागेवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे दोन गटात सरळ लढत होत आहे. मंगरूळ येथेही ९ जागांसाठी १८ अर्ज राहिल्याने दुरंगी लढत होत आहे. तांदळगावात ७ जागांसाठी १४, देविखिंडीत ९ जागांसाठी १८, मेंगाणवाडीत ७ जागांसाठी १४, भिकवडी बुद्रुक येथे ९ जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने दुरंगी लढत आहे.खंबाळे (भा.) येथे ९ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. माहुली येथे ११ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. पारे येथे ११ पैकी सर्वाधिक ८ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक कार्यकर्त्यांना यश आले असून उर्वरित ३ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पोसेवाडीत ७ पैकी १ जागा बिनविरोध झाली असून उर्वरित ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. भडकेवाडीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून पाच जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. शेंडगेवाडीत ७ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर खानापूर पोटनिवडणुकीत एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असल्याने याठिकाणी मोठी चुरस निर्माण होणार आहे. (वार्ताहर)प्रतिष्ठेची लढतखानापूर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीची निवडणूक १९७० पासून बिनविरोध होत होती. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळने ही परंपरा अखंडित ठेवली होती. परंतु, यावेळी रामरावदादा पाटील यांना खा. संजय पाटील समर्थकांनी आव्हान दिल्याने बिनविरोधची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी गावातील मतदारांना तब्बल ४५ वर्षांनंतर मतदान करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी, ही निवडणूक रामरावदादा व संजयकाका या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे.बिनविरोध झालेले उमेदवारखानापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीत १८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध सदस्यांमध्ये खंबाळे (भा.)- सुलक्षणा कांतिलाल मस्के, सिंधुताई बाळकृष्ण सुर्वे, प्रताप विलास पाटील, लक्ष्मीबाई भरत सुर्वे, पारे - लक्ष्मी बाळू एटमे, नजमा कमाल नदाफ, पवन संजय साळुंखे, सुनंदा वाल्मिक सूर्यवंशी, सुरेखा शहाजी साळुंखे, रूक्साना नजीर मुलाणी, धनाजी बाळासाहेब शेळके, तुकाराम पांडुरंग वलेकर. पोसेवाडी - पार्वती शंकर पिसाळ. माहुली - मीराबाई संतू बारसिंग, संगीता विपुल माने. रेणावी - हुसेन अहंमद शिकलगार. भडकेवाडी - तानाजी संभाजी कदम, उज्ज्वला उदयकुमार जाधव यांचा समावेश आहे.
खानापूर तालुक्यात १८ जागा बिनविरोध
By admin | Published: July 16, 2015 12:13 AM