सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांविरुद्ध पॅनेल लागण्याची व संघर्षाची चिन्हे दिसत होती. प्रत्यक्षात शेतकरी संघटनेचेही पूर्ण पॅनेल होऊ शकत नसल्याने संघर्षाची शक्यता मावळली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी २१ जागांसाठी तब्बल १५४ उमेदवारांचे १८२ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी तब्बल ३१२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. त्यामुळे ‘पॅनेल टू पॅनेल’ निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रघुनाथदादा पाटील यांनी सत्ताधारी गटाविरोधात पूर्ण पॅनेल उभारण्याचा निर्धार व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्यांच्या गटाचे सुमारे १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या पॅनेलला अडचणी आल्या आहेत. भाजपचे नेते दीपक शिंदे यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांच्या गटाकडूनही निवडणूक लढविण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. माजी आमदार दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी अद्याप त्यांचीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. पूर्ण पॅनेल उभारण्याच्यादृष्टीने कोणाचीही तयारी नसल्याने संघर्ष मावळण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिमदिवशी १८२ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये कारखान्याच्या विद्यमान १६ संचालकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर दादा गटाचे निष्ठावंत असलेल्या गणपतराव सावंत यांना भिलवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्ताधारी गटाने ठराविक इच्छुकांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांचाही अर्ज दाखल झाला आहे. उत्पादक गटातून सर्वाधिक ४० अर्ज सांगली मतदारसंघातून दाखल झाले आहेत. त्यानंतर तासगावमधून ३२ आणि आष्ट्यातून ३४ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी २७ एप्रिल रोजी होणार असून, वैध अर्जांची यादी गुरुवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. अंतिम टप्प्यातच निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)पुन्हा इच्छुक : विद्यमान संचालकांचे अर्जवसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष डी. के. पाटील यांच्यासह अदिनाथ मगदूम, राजेश एडके, महादेव कोरे, विठ्ठल पाटील, सुनील आवटी, संदेश आडमुठे, शामराव पाटील, सचिन डांगे, अमित पाटील, अशोक अनुगडे, दिलीप पवार, विजयकुमार मोहिते, प्रकाश कांबळे, शैलजा पाटील या १६ विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे उमेदवार जवळपास निश्चित समजले जात आहेत.
‘वसंतदादा’ निवडणुकीसाठी १८२ अर्ज
By admin | Published: April 26, 2016 11:31 PM