सांगली : जिल्ह्यात पाच दिवसापासून झालेला वळीव पाऊस व गारपिटीचा फटका शेत पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील ५६ गावांमधील १८६.०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक नुकसान तासगाव, जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष, आंबा, डाळिंब यासह रब्बी हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून वळीव पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, वाळवा तालुक्यात रब्बी पिकांसह द्राक्ष, बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागात फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही भागातील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. जिल्ह्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह उन्हाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी पावसाचा जिल्ह्यातील ५६ गावांना झोडपले. या वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २० ते २५ खांब पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. परिणामी वादळी पावसाचा महावितरणला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
वळीव पावसामुळे पिकांचे नुकसानतालुका - शेतकरी - क्षेत्रमिरज - ८९ - ४९.३५तासगाव - १११ - ५२.९०क.महांकाळ - १२ - ७.५०वाळवा - ४६ - ३७.७०खानापूर - २९ - ११.८३जत - ३३ - २४.२०एकूण - ३२१ - १८६.०८
वळीव पावसामुळे असे झाले नुकसान
- बाधित गावे : ५६
- जिरायत पिकांचे नुकसान : १.८० हेक्टर
- बागायत पिकांचे नुकसान : २८.०५ हेक्टर
- फळपिकांचे नुकसान : १५६.२३ हेक्टर
- एकूण पिकांचे नुकसान : १८६.०८ हेक्टर
- बाधित शेतकरी संख्या : ३२१