तासगाव : तासगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा मंगळवारी निकाल लागला. मतदारांनी १९ ग्रामपंचायतींत विद्यमान कारभाऱ्यांना हादरा देत सत्तांतर घडवून आणले. गतवेळच्या तुलनेत या निवडणुकीत राष्ट्रवादीची काही प्रमाणात पिछेहाट झाली, मात्र गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले. भाजपला अपेक्षित यशाने हुलकावणी दिली असली तरी, राष्ट्रवादीच्या तोडीसतोड वर्चस्व मिळण्यात यश मिळवले. दोन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले. निकालानंतर विजयी कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत जल्लोष साजरा केला.तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल भाजप आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश देणारा ठरला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात होत असलेल्या या निवडणुकीला यावेळी विशेष महत्त्व आले होते. तालुक्यात होत असलेल्या राजकीय उलथापालथींमुळे ग्रामपंचायतीत सत्तेचा पट कोणाचा असणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. तालुक्यावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला या निकालाने होणार असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले होते.मंगळवारी सकाळी आठ वाजता तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. पहिल्या निकालापासून गुलालाची उधळण आणि घोषणांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. निकाल जाहीर होतील, तसे विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करत गावाकडे रवाना होत होते. चार फेरीत मतमोजणी झाली. तालुक्यातील ३६ पैकी तब्बल १९ गावांतील मतदारांनी विद्यमान कारभाऱ्यांना झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. शिरगाव (वि.), हातनोली, गोटेवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, येळावी, राजापूर, वाघापूर आणि वडगाव दहा ग्रामपंचायतींची सत्ता आबा गटाकडून काका गटाकडे गेली, तर निंबळक, बोरगाव, पेड, धामणी, लोकरेवाडी, धुळगाव या सहा ग्रामपंचायतींची सत्ता काका गटाकडून आबा गटाकडे आली. तालुकास्तरावरील आणि नेत्यांच्या राजकारणापेक्षा स्थानिक समीकरणांचाच या निवडणुकीत पगडा राहिला. त्यामुळे दोन्ही गटांना त्याचा फटका बसला. येळावीत बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांना जबरदस्त हादरा बसला. त्यांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसने अटीतटीची झुंज दिली. मात्र काका गटाने वर्चस्व मिळवले. विसापुरातील निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादी पॅनेलविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी काका गटाशी हातमिळवणी करून पॅनेल उभा केले होते. मात्र सूतगिरणीचे उपाध्यक्ष पतंगबापू माने आणि अर्जुन पाटील यांनी जोराची झुंज देत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. मांजर्डे ग्रामपंचायतीची निवडणूक दिनकरदादा पाटील यांच्याविरोधात भाजप असेच चित्र रंगले होते. या ठिकाणी राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले असले तरी, बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळाले. पेडमध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचे बंधू दत्तूअण्णा खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता काबीज करण्यात राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील यांना यश मिळाले. सावळजमध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांनी भाजपशी हातमिळवणी करून ताकद एकवटली. तेथे सत्ता परिवर्तन करून चंद्रकांत पाटील यांना हादरा दिला.निवडणूक निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चांगलाच गुलाल उधळला होता. कोणाच्या गटाच्या किती ग्रामपंचायती, कोणाचे किती सदस्य यावरून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच श्रेयवाद सोशल मीडियावर सुरू होता. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा आनंदही सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहत होता. (वार्ताहर)तीन उमेदवारांना समान मते, धामणीत निर्णायक सत्तांतर धुळगाव, डोर्ली, सिध्देवाडी आणि धामणीतील प्रत्येकी एका जागेसाठी समान मते मिळाल्यामुळे लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला. धुळगावमध्ये उज्वला सुरेश सुतार आणि नगिना रमजान मुलाणी यांना २६३ मते मिळाली. उज्वला सुतार यांना विजयी घोषित केले. डोर्लीत दशरथ विठ्ठल जाधव आणि रामगौंडा मलगौंडा पाटील यांना प्रत्येकी १२१ मते मिळाली. चिठ्ठीतून रामगौंडा पाटील यांना विजयी घोषित केले, तर धामणीत भाजप आणि राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या होत्या. अन्य एका जागेसाठी सिंधुताई भारत शिंदे आणि रमाबाई भरत सपकाळ यांना प्रत्येकी १२० मते मिळाली. चिठ्ठीतून रमाबाई सपकाळ यांना विजयी घोषित करण्यात आले. सिध्देवाडीत आप्पासाहेब देवाप्पा चव्हाण आणि किशोर माणिक चव्हाण यांना प्रत्येकी २८३ मते मिळाली. चिठ्ठीतून आप्पासाहेब चव्हाण यांना विजयी घोषित केले.येळावी, मांजर्डे येथेलागली उत्कंठा पणाला येळावी आणि मांजर्डे या दोन मोठ्या गावांच्या मतमोजणीस शेवटी सुरुवात झाली. दोन्ही गावांच्या पहिल्या दोन फेऱ्यानंतर येळावीत भाजप आणि काँग्रेसला, तर मांजर्डेत राष्ट्रवादी आणि भाजपला समसमान प्रत्येकी सहा-सहा जागांवर विजय मिळाला. शेवटच्या फेरीतील जागांच्या निकालावरच सत्तेचे समीकरण अवलंबून असल्याने सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा पणाला लागली होती. येळावीत शेवटच्या फेरीत भाजपने बाजी मारून वर्चस्व मिळवले, तर मांजर्डेत राष्ट्रवादीने बाजी मारून वर्चस्व मिळवले.सात ग्रामपंचायतींत एकहाती सत्ता मिळविल्या... तालुक्यातील यमगरवाडी, गव्हाण येथे राष्ट्रवादीने, तर जरंडी, वडगाव, आळते, हातनोली, वाघापूर येथे भाजपने एकतर्फी विजय मिळवला. कौलगे, डोंगरसोनी, सिध्देवाडी, बोरगाव, पेड येथे राष्ट्रवादीने, तर गोटेवाडी, गौरगाव, नरसेवाडी, ढवळी या ग्रामपंचायतींत भाजपने काटावर सत्ता मिळाली.धक्का : आजी-माजी पदाधिकाऱ्यांना३६ गावांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही गावांत नेतृत्व केले होते; मात्र या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवता आले नसल्याने हादरा बसला आहे. त्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, बाजार समितीचे संचालक अजित जाधव, विवेक शेंडगे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, पंचायत समितीचे सदस्य जयवंत माळी यांचा समावेश आहे.
‘तासगाव’मधील १९ ग्रामपंचायतीत सत्तांतर
By admin | Published: November 03, 2015 11:14 PM