अशोक डोंबाळेसांगली : मान्सूनच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला असून, दुसऱ्या बाजूला दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यातील १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. या ठिकाणच्या एक लाख २५ हजार लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात असे विदारक चित्र असतानाच ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे.पाटबंधारे विभागाच्या २९ जुलै २०२४च्या अहवालानुसार, जिल्ह्यात मध्यम आणि लघु ८३ प्रकल्पांची नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्या क्षमता आहे. यापैकी सद्या पाच हजार १८६.०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात दोड्डानाला, संख, बसाप्पावाडी, मोरणा आणि सिद्धेवाडी असे मोठे पाच पाझर तलाव आहेत. या तलावांमध्ये ४५ टक्के पाणीसाठा आहे. या तलावांमध्ये गतवर्षी ३४ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पाणीसाठा जास्त आहे.तसेच ७८ लघु प्रकल्पामध्ये ५३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या लघु प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत ३७ टक्के पाणीसाठा जास्त आहे. पण, जत, आटपाडी तालुक्यात पाऊस कमी असल्यामुळे तेथील खरीप हंगामातील पीक अडचणीत आहेत. या तालुक्यातील ४४ गावे आणि ३६६ वाड्यांमधील एक लाख २६ हजार २०४ लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच २८ हजार ३०५ पशुधनलाही टँकरनेच पाणीपुरवठा होत आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यामुळे वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यातील १०४ गावांतील ४८२ कुटुंबातील दोन हजार ४१ नागरिकांना स्थलांतर व्हावे लागले आहे.
शंभर टक्के भरलेले तलावआटपाडी, घाणंद, शेटफळे (ता. आटपाडी), मोरणा, अंत्री, शिवनी, टाकवे, वाकुर्डे (ता. शिराळा), कडेगाव, आळसुंद, चिंचणी अंबक, कडेगाव, कारंडेवाडी, शाळगाव (ता. कडेगाव), बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाकुचीवाडी (ता. खानापूर), लिंगनूर (ता. मिरज), अंजनी, बलगवडे, लोढे, पुणदी, (ता. तासगाव) आणि रेठरेधरण (ता. वाळवा) येथील तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठी झाला आहे.
जिल्ह्यातील तलावांची स्थितीतालुका - तलाव -पाणीसाठा (टक्के) संख्या - २९ जुलै २०२४ - २९ जुलै २०२३तासगाव - ७ - ८६ - ३खानापूर - ८ - ६८ - १८कडेगाव - ७ - ९६ - ४३शिराळा - ५ - १०० - ९२आटपाडी - १३ - ६४ - २३जत - २७ - १७ - २क.महांकाळ - ११ - २८ - ९मिरज - ३ - ९४ - १३वाळवा - २ - ८१ - ७
येथील तलाव कोरडेजत तालुक्यातील पांडोझरी, सिध्दनाथ, सोरडी, तिकोंडी क्रमांक १, उमराणी, अंकलगी, भिवर्गी, बिळूर, दरीबडची, गुगवाड, जालीहाळ, खोजनवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ, आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील एक, जत तालुक्यातील चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तलावांमध्ये मृतपाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षीपेक्षा ३० टक्के जादा पाणीसाठा
जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये गतवर्षी २९ जुलै २०२३ रोजी २१ टक्के पाणीसाठा होता. याच तारखेला यावर्षी ५१ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.