सांगली: सांगलीतील डॉक्टर निकेत शहा यांना कुरिअर कंपनीतून बोलतोय असे भासवून सीआयडी चौकशीच्या नावाखाली मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगून १९ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. शहा यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर निकेत कांतीलाल शहा यांचा शंभरफुटी रस्त्यावर डी मार्टजवळ दवाखाना आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना अनोळखी मोबाइलवरून कॉल आला. ‘डीएचएल’ या कुरिअर कंपनीतून बोलतोय असे समोरील व्यक्तींने सांगितले. त्याने डॉक्टरांना ‘तुम्ही चायना येथे एक कुरिअर पाठवले आहे, त्यामध्ये बनावट २० पासपोर्ट, व्हिसा, चायनिज करन्सी व लॅपटॉप आहे.
हा प्रकार बेकायदेशीर आहे असे सांगून त्याने डॉक्टरांना मोबाइलवर स्काईप ॲप इनस्टॉल करण्यास सांगितले. त्याद्वारे डॉक्टरांची संपूर्ण माहिती मिळवली. पुन्हा त्यांना अंधेरी पोलिस ठाणे व मुंबई सीआयडी कार्यालयातून पुढील चौकशी होईल असे सांगून स्काईप ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सीआयडीच्या नावाखाली डॉ. शहा यांच्या खात्यावरील सर्व रक्कम वर्ग करून घेतली. अर्धा तासात सर्व गोष्टींची पडताळणी करून त्यांच्या खात्यावर सर्व रक्कम परत पाठवून डॉ. शहा यांना विश्वास दिला.
दि. ३ ते ९ फेब्रुवारी या काळात डॉ. शहा यांचे खाते असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर १० लाख रुपये, इंडसंड बँकेच्या खात्यावर ६ लाख २३ हजार रुपये तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या अन्य खात्यावर २ लाख २१ हजार ५०० रुपये आरटीजीएस करण्यास सांगून १९ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक केली. दरम्यान डॉ. शहा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.