सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील ६४ गावे स्पर्धेत सहभागी झाली आहेत. विजेत्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने ही माहिती दिली. पुण्याच्या वनराई संस्थेमार्फत या गावांत भूजल समृद्धीसाठी प्रबोधन केले जात आहे. जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन निधी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांसाठी स्पर्धा आहे. भूजल उपसा नियंत्रित करुन भूजल स्तर उंचावण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाईल. अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित वर्गवारीतील गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नगदी पिकांसाठी बेसुमार उपशामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. विंधन विहिरीद्वारे उपशामुळे भूजलाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ९४ गावांत अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे.
२५ एप्रिलपर्यंत मुदत
अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेत सहभागासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या ठरावाच्या प्रतींसह जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडे २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव द्यायचे आहेत.
राज्यस्तरावर एक कोटींचे बक्षीस
दोन्ही वर्षांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. जिल्हास्तरावर विजेत्या गावाला ५० लाखांचे बक्षीस आहे. या गावाला पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेता येईल. जिल्हास्तरावर द्वितीय बक्षीस ३० लाख व तृतीय बक्षीस २० लाख रुपये आहे. राज्यस्तरावरील विजेत्यासाठी पहिले बक्षीस तब्बल एक कोटी रुपये आहे.